गुरुवार, १६ ऑक्टोबर
यहोवासाठी मार्ग मोकळा करा! वाळवंटातून जाणारा महामार्ग आपल्या देवासाठी तयार करा.—यश. ४०:३.
बाबेलपासून इस्राएलला जाण्याच्या खडतर प्रवासाला जवळपास चार महिने लागणार होते. पण यहोवाने त्यांना वचन दिलं होतं, की या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तो काढून टाकेल. पण विश्वासू यहुद्यांना हे माहीत होतं, की इस्राएलला परत जाण्यासाठी त्यांना जितके त्याग करावे लागतील त्यापेक्षा कितीतरी जास्त आशीर्वाद त्यांना मिळणार होते. आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद तर उपासनेच्या बाबतीत होता. यहोवाचं एकही मंदिर बाबेल शहरात नव्हतं. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे अर्पणं देण्यासाठी तिथे एकही वेदी नव्हती. आणि ती अर्पणं वाहण्यासाठी तिथे याजकांची कोणतीही व्यवस्था नव्हती. शिवाय, यहोवाच्या लोकांपेक्षा तिथे मूर्तिपूजा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. आणि त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल जराही आदर नव्हता. त्यामुळे हजारो विश्वासू यहुदी आपल्या मायदेशी जाऊन शुद्ध उपासना करण्यासाठी खूप उत्सुक होते. टेहळणी बुरूज२३.०५ १४-१५ ¶३-४
शुक्रवार, १७ ऑक्टोबर
प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा.—इफिस. ५:८.
“प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” चालत राहण्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र शक्तीची गरज आहे. का? कारण या अनैतिक जगात नैतिक रित्या शुद्ध राहणं खरंच एक आव्हान आहे. (१ थेस्सलनी. ४:३-५, ७, ८) पण, पवित्र शक्तीमुळे आपल्याला जगाच्या विचारसरणीविरुद्ध लढायला मदत होते. यात देवाच्या विचारसरणीविरुद्ध असलेलं जगातलं तत्त्वज्ञान आणि विचारसरणीसुद्धा सामील आहे. यासोबतच, देवाच्या पवित्र शक्तीमुळे आपल्याला ‘सर्व प्रकारचा चांगुलपणा आणि नीतिमत्त्व’ विकसित करायलाही मदत होऊ शकते. (इफिस. ५:९) पवित्र शक्ती मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्यासाठी प्रार्थना करणं. येशूने म्हटलं होतं, की ‘जे स्वर्गातल्या पित्याकडे मागतात त्यांना तो नक्कीच पवित्र शक्ती देतो.’ (लूक ११:१३) आणि सभांमध्ये आपण एकत्र मिळून यहोवाची उपासना करतो तेव्हासुद्धा आपल्याला पवित्र शक्ती मिळते. (इफिस. ५:१९, २०) पवित्र शक्तीमुळे आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू शकतो. टेहळणी बुरूज२४.०३ २३-२४ ¶१३-१५
शनिवार, १८ ऑक्टोबर
मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.—लूक ११:९.
तुम्हाला आणखी धीर दाखवण्याची गरज आहे का? तर मग त्यासाठी प्रार्थना करा. धीर हा पवित्र शक्तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) त्यामुळे आपण पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करू शकतो आणि हा गुण वाढवण्यासाठी यहोवाकडे मदत मागू शकतो. आपल्या धीराची परीक्षा होईल अशी परिस्थिती जर आपल्यावर आली, तर आपल्याला धीर दाखवता यावा म्हणून आपण पवित्र शक्ती ‘मागत राहू’ शकतो. (लूक ११:१३) त्याच प्रकारे परिस्थितीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठीसुद्धा आपण त्याच्याकडे मदत मागू शकतो. प्रार्थना केल्यानंतर आपण दररोज धीर दाखवण्याचा होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे. आपण धीरासाठी जितकी जास्त प्रार्थना करू आणि धीर धरत राहण्याचा जितका प्रयत्न करू, तितका हा गुण आपल्या मनात रुजेल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनेल. बायबलमधल्या उदाहरणांवर मनन केल्यानेही खूप मदत होते. बायबलमध्ये अशा बऱ्याच लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी धीर दाखवला. या लोकांच्या अहवालांवर मनन केल्यामुळे आपण वेगवेगळ्या मार्गांनी धीर दाखवायला शिकू शकतो. टेहळणी बुरूज२३.०८ २२ ¶१०-११