बुधवार, १६ जुलै
बुद्धिमानांचे तर्क व्यर्थ आहेत हे यहोवाला माहीत आहे.—१ करिंथ. ३:२०.
माणसांच्या विचाराने चालू नका. आपण जर कोणत्याही गोष्टीकडे मानवी दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न केला तर आपण कदाचित यहोवाला आणि त्याच्या स्तरांना विसरून जाऊ. (१ करिंथ. ३:१९) “जगाची बुद्धी” ही आपल्याला नेहमी स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला प्रवृत्त करते. पहिल्या शतकातल्या पर्गम आणि थुवतीरा या शहरांमधले लोक मूर्तिपूजक आणि अनैतिक होते. त्यामुळे या शहरांमध्ये राहणाऱ्या काही ख्रिश्चनांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव झाला होता. या दोन्ही शहरांतल्या मंडळ्यांनी लैंगिक अनैतिकतेला खपवून घेतल्यामुळे येशूने कडक शब्दांत त्यांना सल्ला दिला होता. (प्रकटी. २:१४, २०) आजसुद्धा आपल्यावर जगाची चुकीची विचारसरणी स्वीकारायचा दबाव येत असतो. आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या ओळखीचे लोक कदाचित आपल्याला हे पटवून द्यायचा प्रयत्न करतील, की यहोवाचे नियम खूप कडक आहेत आणि आपल्याला नेहमीच ते पाळायची गरज नाही. उदाहरणार्थ, कदाचित ते आपल्याला असं सांगतील, की बायबलचे नैतिक स्तर आता जुने झाले आहेत आणि त्यामुळे स्वतःची इच्छा पूर्ण करणं ही काही वाईट गोष्ट नाही. कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की यहोवाने दिलेलं मार्गदर्शन पुरेसं नाही. त्यामुळे “लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे” जाण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो.—१ करिंथ. ४:६. टेहळणी बुरूज२३.०७ १६ ¶१०-११
गुरुवार, १७ जुलै
खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.—नीति. १७:१७.
येशूची आई मरीयाला बळाची गरज होती. तिचं लग्न झालं नव्हतं तरीही ती गरोदर राहणार होती. तिला मुलं वाढवण्याचा काहीच अनुभव नव्हता. पण तरी तिला अशा एका बाळाला वाढवायचं होतं, जे पुढे जाऊन मसीहा बनणार होतं. तिने कुठल्याही पुरुषाशी संबंध ठेवले नव्हते, पण तरी ती आई बनणार होती. आणि आता ज्याच्यासोबत तिचं लग्न ठरलं होतं, त्या योसेफला हे सगळं कसं समजावून सांगायचं, हा प्रश्नसुद्धा तिच्यासमोर होता. (लूक १:२६-३३) मरीयाला कुठून बळ मिळालं? यासाठी तिने इतरांची मदत घेतली. उदाहरणार्थ, तिने गब्रीएल स्वर्गदूताला तिच्यावर असलेल्या या जबाबदारीबद्दल आणखी माहिती विचारली. (लूक १:३४) याच्या काही काळानंतर ती तिची नातेवाईक अलीशिबा हिला “डोंगराळ प्रदेशातल्या यहूदाच्या एका शहरात” भेटायला गेली. अलीशिबाने मरीयाचं कौतुक केलं आणि मरीयाच्या होणाऱ्या बाळाबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी यहोवाने तिला प्रेरित केलं. (लूक १:३९-४५) यामुळे मरीयाला आनंद झाला आणि तिने म्हटलं, की यहोवाने “आपल्या हाताने आपला पराक्रम दाखवलाय.” (लूक १:४६-५१) अशा प्रकारे गब्रीएल स्वर्गदूताद्वारे आणि अलीशिबाद्वारे यहोवाने मरीयाला बळ दिलं. टेहळणी बुरूज२३.१० १४-१५ ¶१०-१२
शुक्रवार, १८ जुलै
त्याचा देव आणि पिता याच्यासाठी [त्याने] आपल्याला एक राज्य आणि याजक असं केलं.—प्रकटी. १:६.
ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी फक्त मोजक्याच लोकांना पवित्र शक्तीने अभिषिक्त करण्यात येतं. यामुळे यहोवासोबत त्यांचं एक खास नातं तयार होतं. हे १,४४,००० जण येशूसोबत स्वर्गात याजक म्हणून सेवा करतील. (प्रकटी. १४:१) देवाच्या या मुलांना पृथ्वीवर असताना पवित्र शक्तीने अभिषिक्त करण्यात येतं. उपासना मंडपातलं पवित्र स्थान हे त्यांच्या या अभिषिक्त असण्याच्या स्थितीला सूचित करतं. (रोम. ८:१५-१७) उपासना मंडपातलं परमपवित्र स्थान हे स्वर्गाला सूचित करतं, जिथे यहोवाचं अस्तित्व आहे. पवित्र आणि परमपवित्र स्थानाला विभाजित करणारा “पडदा” हा येशूच्या हाडामांसाच्या शरीराला सूचित करतो. या शरीरामुळे आध्यात्मिक मंदिराचा श्रेष्ठ महायाजक म्हणून त्याला स्वर्गात जाता येणार नव्हतं. आपलं हाडामांसाचं शरीर मानवजातीसाठी बलिदान दिल्यामुळे सर्व अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी स्वर्गातल्या जीवनाचा मार्ग येशूने मोकळा केला. पण यासाठी त्यांना स्वतःच्या हाडामांसाच्या शरीराचा त्याग करणंही गरजेचं आहे.—इब्री १०:१९, २०; १ करिंथ. १५:५०. टेहळणी बुरूज२३.१० २८ ¶१३