शुक्रवार, १८ जुलै
त्याचा देव आणि पिता याच्यासाठी [त्याने] आपल्याला एक राज्य आणि याजक असं केलं.—प्रकटी. १:६.
ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी फक्त मोजक्याच लोकांना पवित्र शक्तीने अभिषिक्त करण्यात येतं. यामुळे यहोवासोबत त्यांचं एक खास नातं तयार होतं. हे १,४४,००० जण येशूसोबत स्वर्गात याजक म्हणून सेवा करतील. (प्रकटी. १४:१) देवाच्या या मुलांना पृथ्वीवर असताना पवित्र शक्तीने अभिषिक्त करण्यात येतं. उपासना मंडपातलं पवित्र स्थान हे त्यांच्या या अभिषिक्त असण्याच्या स्थितीला सूचित करतं. (रोम. ८:१५-१७) उपासना मंडपातलं परमपवित्र स्थान हे स्वर्गाला सूचित करतं, जिथे यहोवाचं अस्तित्व आहे. पवित्र आणि परमपवित्र स्थानाला विभाजित करणारा “पडदा” हा येशूच्या हाडामांसाच्या शरीराला सूचित करतो. या शरीरामुळे आध्यात्मिक मंदिराचा श्रेष्ठ महायाजक म्हणून त्याला स्वर्गात जाता येणार नव्हतं. आपलं हाडामांसाचं शरीर मानवजातीसाठी बलिदान दिल्यामुळे सर्व अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी स्वर्गातल्या जीवनाचा मार्ग येशूने मोकळा केला. पण यासाठी त्यांना स्वतःच्या हाडामांसाच्या शरीराचा त्याग करणंही गरजेचं आहे.—इब्री १०:१९, २०; १ करिंथ. १५:५०. टेहळणी बुरूज२३.१० २८ ¶१३
शनिवार, १९ जुलै
जर मी गिदोन संदेष्ट्याबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.—इब्री ११:३२.
एफ्राईमच्या लोकांनी जेव्हा गिदोनची टीका केली, तेव्हा त्याने सौम्यपणे उत्तर दिलं. (शास्ते ८:१-३) तो त्यांच्याशी रागाने बोलला नाही. उलट, ते लोक जी तक्रार करत होते, ती त्याने नम्रपणे ऐकून घेतली आणि तो त्यांच्याशी सौम्यपणे बोलला. अशा प्रकारे त्याने त्यांचा राग शांत केला. वडिलांची टीका केली जाते तेव्हा तेसुद्धा गिदोनप्रमाणे समोरच्याचं लक्ष देऊन ऐकू शकतात आणि सौम्यपणे उत्तर देऊ शकतात. (याको. ३:१३) असं करून ते मंडळीतली शांती टिकवून ठेवू शकतात. मिद्यानी लोकांवर विजय मिळवल्यानंतर गिदोनची स्तुती होऊ लागली तेव्हा त्याने लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधण्याऐवजी यहोवाची स्तुती होऊ दिली. (शास्ते ८:२२, २३) आज जबाबदार बांधव गिदोनचं अनुकरण कसं करू शकतात? ते जे काही करतात त्याचं श्रेय ते यहोवाला देऊ शकतात. (१ करिंथ. ४:६, ७) उदाहरणार्थ, आपल्या शिकवण्याच्या कौशल्यासाठी जेव्हा एखाद्या वडिलांची प्रशंसा केली जाते, तेव्हा ते सांगू शकतात की त्यांनी जे काही शिकवलं ते देवाच्या वचनातून होतं. किंवा संघटनेकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळेच त्यांना चांगल्या प्रकारे शिकवता आलं. तसंच, आपण इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधायचा प्रयत्न करत आहोत का याबद्दल वडिलांनी स्वतःचं परीक्षण करणंही गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२३.०६ ४ ¶७-८
रविवार, २० जुलै
माझे विचार तुमच्या विचारांसारखे नाहीत.—यश. ५५:८.
आपल्याला जेव्हा आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही तेव्हा आपण स्वतःला विचारलं पाहिजे, ‘मी योग्य गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे का?’ बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की ‘माझ्यासाठी योग्य काय हे मला माहीत आहे.’ पण आपण ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतोय त्यांचा जास्त काळ कदाचित आपल्याला फायदा होणार नसेल. आपण कदाचित यहोवाने एका विशिष्ट मार्गाने आपली समस्या सोडवावी म्हणून त्याला प्रार्थना करत असू. पण त्या समस्येवर यापेक्षाही चांगला उपाय असू शकतो. शिवाय असंही होऊ शकतं, की आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय, ती कदाचित यहोवाच्या इच्छेप्रमाणे नसेल. (१ योहा. ५:१४) उदाहरणार्थ, एका आईवडिलांचाच विचार करा. त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली होती, की त्यांच्या मुलाने सत्यात टिकून राहावं. त्यांनी यहोवाकडे केलेली ही प्रार्थना योग्य आहे, असं कदाचित आपल्याला वाटेल. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की यहोवा कोणावरही त्याची सेवा करायची जबरदस्ती करत नाही. तर आपण सर्वांनी, यात आपली मुलंसुद्धा येतात, स्वतःहून त्याची उपासना करण्याचं निवडावं असं त्याला वाटतं. (अनु. १०:१२, १३; ३०:१९, २०) म्हणून आईवडिलांनी खरंतर यहोवाला अशी प्रार्थना करायला पाहिजे, की त्याने त्यांच्या मुलाच्या मनापर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करावी, म्हणजे यहोवावर प्रेम करायला आणि त्याचा मित्र बनायला ते त्याला प्रोत्साहन देऊ शकतील.—नीति. २२:६; इफिस. ६:४. टेहळणी बुरूज२३.११ २१ ¶५; २३ ¶१२